कोरोना योद्ध्यांच्या परिश्रमानेच लढाईला बळ : पालकमंत्री देसाई

Foto
कोरोनायाद्ध्यांच्या अथक परिश्रमातून कोरोना विरुद्धची लढाई लढतच नाही तर जिंकतही आहोत. अशाप्रकारे शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनामुक्त महाराष्ट्रासाठी सर्व लक्ष केंद्रीत करत आरोग्य सुविधा, उपचार यासाठी प्राधान्याने निधीची उपलब्धता, जिल्हास्तरावर अधिकारांचे विकेंद्रीकरण करून या संकट काळात रूग्णाच्या जीवित संरक्षणासाठी आरोग्य यंत्रणाच्या सक्षमीकरणाला सर्वोच्च प्राधान्य दिले. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात आपण गेल्या चार महिन्यात गतिमानतेने आरोग्य सुविधांमध्ये लक्षणीय वाढ केली. आपल्या सर्व असा विश्वास पालकमंत्री तथा उद्योग, खनिकर्म, मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला. 
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात स्वातंत्र्य दिनानिमित्त पालकमंत्री सुभाष देसाई यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले, याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी स्वातंत्रसैनिक, खासदार इम्तियाज जलील, आ. संजय सिरसाट, आ. प्रदीप जैस्वाल, आ. अंबादास दानवे, विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर, प्रभारी जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, महानगरपालिका आयुक्त अस्तिक कुमार पांडेय, पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर  यांच्यासह विविध जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, विविध पदाधिकारी, इतर सर्व मान्यवर, अधिकारी यांची उपस्थिती होती.  यावेळी पालकमंत्री देसाई यांनी कोरोना योद्धे, घाटीच्या औषध विभाग प्रमुख डॉक्टर मिनाक्षी भट्टाचार्य, एमजीएमचे डॉ. आनंद निकाळजे, जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या डॉ. पद्मजा सराफ, आरोग्य सेवक इसीजी तंत्रज्ञ प्रशांत फुलारे, परिचारिका ज्योती दारवंटे, राहुल वाटोरे, एमआयटी कोविड केअर सेंटरचे सफाई कामगार नरेंद्र घुमर, अक्षय वाघ आणि किलेअर्क कोविड केअर सेंटरचे कृष्णा हिवाळे व कोरोना आजारावर मात केलेल्या नागरिकांची प्रातिनिधिक स्वरूपात भेट घेऊन त्यांना प्रोत्साहित केले.
यावेळी देसाई म्हणाले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय (घाटी), महानगरपालिकेचे रूग्णालये व अल्पावधित उभारलेले मेल्ट्रॉन कोविड रूग्णालय, इतर खासगी रूग्णालये तसेच  जनतेच्या उत्सफूर्त प्रतिसादाने कडकपणे राबवलेल्या लॉकडाऊनमुळे कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यास अभूतपूर्व यश आले आहे. औरंगाबाद महानगरपालिका अँटीजेन चाचण्या करण्यात प्रथम क्रमांकावर असून इतर जिल्ह्यांसह देशात याचे अनुकरण करण्यात येत आहे. ही जिल्ह्यासाठी कौतुकाची बाब आहे. महानगरपालिकेतर्फे सेरो सर्वेक्षण सुरू असून यास जनतेची साथ मिळत आहे. त्याचबरोबर कोरोना रूग्णांसाठी उपयुक्त ठरणारी प्लाझ्मा थेरपी तसेच मनपातर्फे राबवण्यात आलेली डॉक्टर आपल्यादारी  हा उपक्रम उपयुक्त ठरत आहे. तर मनपाने तयार केलेले माझे आरोग्य माझ्या हाती अ‍ॅप अनुकरणीय ठरले आहे. तब्बल सहा हजार उद्योग सुरू झाले असल्याने कामगारांना त्यांचा रोजगार परत मिळाले आहे. यात औषधी उत्पादन, खाद्य पुरवठा, खाद्य प्रक्रिया इत्यादींचा समावेश आहे. या काळात गरिबांना आवश्यक अन्नधान्य मिळाले आहे. गरजूंना अल्प दरात जेवणाची सुविधा उपलब्ध करूण देण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या शिवभोजन हा उपक्रम खूप उपयुक्त  ठरल्याचे ते म्हणाले.